म. ए. सो. विद्या मंदिर, बेलापूर
म.ए.सो.विद्या मंदिर येथे मराठी दिवस उत्साहात साजरा
म. ए.सो. विद्यामंदिर शाळेत मराठी राजभाषा दिन नाविन्यपूर्ण उपक्रमसहित उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रमुख अतिथी मा. श्री.श्रीराम गोऱ्हे (निवृत्त पोलिस अधिकारी व कर्मचारी कल्याणकारी असोशियेशन अध्यक्ष, नवीमुंबई.) यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाने कविमनाची ओळख करून देत कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या वर्षी आठवीच्या विद्यार्थ्यांना उपक्रमांतर्गत पुस्तक वाचनाची गोडी लागावी याउद्देशाने पुस्तक संग्रह करून घरात लहानसे ग्रंथालय निर्माण करण्यास सांगितले व त्या ग्रंथालयाचे उद्घाटन पालकांच्या हस्ते करण्यात आले. यास विद्यार्थी व पालकांचे उत्तम सहकार्य लाभले.
त्याचप्रमाणे ग्रंथालयाचे उद्घाटन करून पालकांसमवेत विद्यार्थ्याचे छायाचित्र काढून त्या छायाचित्रांचा एक अल्बम बनविण्यात आला व त्या अल्बमचे ‘मराठी राजभाषा दिनी’ प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
पहिली ते पाचवीसाठी पुस्तकवाचन व ग्रंथपूजन यातून विद्यार्थ्यांना संस्कार देण्यात आले. सहावी व सातवी या वर्गात संवाद सादरीकरण करून घेण्यात आले.
सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमप्रसंगी नाटकातून विविध काव्यप्रकारांची सुरेखपणे ओळख करून दिली. तसेच आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी भाषा व वाचनाचे महत्त्व विशद केले.
हा कार्यक्रम मुख्याध्यापिका श्रीमती शुभांगी शिंदे व सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.